चंद्रपूर : राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेले दिसून येत आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात दोन उमदेवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठावाडा दौरा केल्यानंतर राज ठाकरेंचा आता विदर्भ दौरा सुरू आहे. आज ते गडचिरोली जिल्ह्यात आहेत.
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून राज ठाकरेंनी गडचिरोली जिल्ह्यातील साकोली येथील मनसैनिक व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, चंद्रपूर येथील बैठकीत राज ठाकरेंनी मनसेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे, विधानसभेसाठी मनसेकडून आत्तापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे . त्यामध्ये, चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, यापूर्वी मराठावाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी 4 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, विदर्भ दौऱ्यात 2 उमेदवारांची घोषणा झाल्याने मनसेनं विधानसभेचा षटकार ठोकल्याचं दिसून येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्याची सुरवात केलीय आहे. त्याची सुरुवात त्यांनी सोलापूरमधून केली होती. सोलापूरमध्ये मुक्काम केल्यानंतर त्यांनी धाराशिव ते हिंगोली असा मराठवाडा दौरा केला. या दौऱ्यात सोलापूरमधूनच त्यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह दिलीप धोत्रे या दोन उमेदवारांची घोषणा केली होती.
त्यामध्ये, मुंबईतील शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली होती. तसेच त्यानंतर लातूर येथून आणखी एका उमेदवारांची घोषणा करण्यात आली. लातूर ग्रामीणसाठी संतोष नागरगोजे यांना मनसेचं तिकीट देण्यात आलं आहे. तर, हिंगोली दौऱ्यावर असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी बंडू कुटे यांना राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली होती.