अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : ता. २२ रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील ढोकसांगवी गावच्या हद्दीत परीटवाडी रोडवर कंटेनर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे मोठा अपघात झाला आहे. कंटेनरची एका दुचाकीला धडक बसुन दुचाकीस्वार खाली पडल्याने त्याच्या डोक्यावरुन कंटेनरचे चाक गेले. यामध्ये हनुमंत भरत गव्हाणे (वय ३८) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याबाबत त्यांची पत्नी सुवर्णा हनुमंत गव्हाणे वय ३२ वर्ष यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता .२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजुन १० मिनिटांच्या सुमारास ढोकसांगवी गावच्या हद्दीत अथर्व कंपनीपासुन अंदाजे २०० मिटर अंतरावर परीटवाडी रोडवर हनुमंत भरत गव्हाणे वय ४२ वर्ष सध्या रा. ढोकसांगवी, परीटवाडी ता. शिरुर जि.पुणे मुळ रा. टाकळीहाजी ता. शिरूर जि. पुणे हे पत्नी सोबत कंपनीतुन सुटल्यानंतर दुचाकी क्रं. एम. एच. १२ व्ही एक्स ८७१२ ही गाडी घेऊन रोडच्या कडेला थांबले असताना.
त्यावेळी समोरुन परीटवाडी बाजुकडून अथर्व कंपनीकडे एक कंटनेर क्रं एम एच ०६ ए क्यु ०९९६ आला. या कंटेनरची ड्रायव्हर साईडने दुचाकीला धडक बसल्याने हनुमंत गव्हाणे दुचाकीवरुन खाली पडले व कंटेनरचे पाठीमागचे चाक हनुमंत गव्हाणे यांच्या डोक्यावरुन गेले. त्यामुळे डोक्याला गंभीर मार लागुन लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने धडक दिली. त्यात हा मोठा अपघात झाला. कंटेनर चालकाविरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारुती पासलकर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.