पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी गेले तीन वर्षे कारागृहात असलेले माजी आमदार अनिल भोसले यांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तीन वर्षांपूर्वी अनिल भोसले यांच्यावर कारवाई केली होती. बँकेतील व्यवस्थापक, भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह सात जणांविरुद्ध पोलिसांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी ८ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
कर्जदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्यात भोसले, बांदल , तसेच अन्य आरोपी कारागृहात होते. बांदल यांची काही महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका झाली होती. भोसले यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने चारवेळा फेटाळला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने काही अटी शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.