विशाल कदम
लोणी काळभोर : बालदिनानिमित्त १०० पेक्षा अधिक बालकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली असल्याची माहिती अंकुर हॉस्पिटलचे मुख्य संचालक व बालरोगतज्ञ डॉ. नितीन वाघमारे यांनी दिली आहे.
बालदिनानिमित्त कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पठारे वस्तीतील अंगणवाडीत बालकांसाठी मोफत आयोग्य शिबिराचे आयोजन सोमवारी (ता.१४) करण्यात आले होते.
या शिबिरात सहा वर्षांखालील १०० हून अधिक बालकांनी सहभाग नोंदविला. यावेळी बालकांचे वजन, हृदयाचे ठोके, उंची, थंडी, ताप, खोकला या तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत आढळलेल्या रुग्ण बालकांना मोफत औषधे देण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. योगिता वाघमारे म्हणाल्या कि, बाळाची वाढ ६ महिन्यांनंतर झपाट्याने होऊ लागते. मातेच्या दुधातील पोषकतत्त्वे कमी पडू लागतात. त्यामुळे बाळाला मातेच्या दुधासोबत इतरही पदार्थ देण्याची गरज असते. यालाच पूरक आहार असे म्हणतात.
सहा महिन्यांनंतर बालकाला पूरक आहार चालू करावा असा वैद्यकीय सल्ला डॉ. योगिता वाघमारे यांनी दिला. तसेच उपस्थित मातांना स्तनपानाविषयी मार्गदर्शन केले.
औंध हॉस्पिटलचे डॉ. नितीन कदम यांनी पालकांना तंबाखु, दारू, गोवा, गुटखा या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी समुपदेशन केले. नेत्रदानाचे महत्व पटवून दिले. तसेच सुकन्या योजनेची माहिती सविस्तर सांगितल.
दरम्यान, या शिबिरात लोणी काळभोर बीटच्या अंतर्गत येणाऱ्या ३० पेक्षा अधिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
उपस्थित बालकांना सिद्धेश्वर काळभोर यांनी खाऊ वाटप केला. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका धनश्री नायर, सर्व अंगणवाडी सेविका, पालक आणि बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.