पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक धक्कादायक प्रकार मागील काही वर्षांमध्ये घडले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कात्रजमध्ये घडली आहे. लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरुन तरुणाने तरुणीवर ब्लेडने वार केला आणि त्यानंतर तिच्यावर अॅसिड टाकतो, अशी धमकी दिली आहे. याबाबत कात्रजमधील एका 21 वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अनिकेत शाम मिसाळ (वय 28, रा. नवरंग सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी पासून आतापर्यंत सुरु होता.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी अनिकेत मिसाळ हे दोघेजण मित्र होते. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन आरोपी अनिकेतने फिर्यादीस लग्नाची मागणी घातली. त्यावेळी तरुणीने लग्नास नकार दिला. त्याच गोष्टीचा राग मनात धरुन अनिकेत फिर्यादीच्या घरी गेला. तसेच तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आरोपी पुढे म्हणाला, ‘‘तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या वडिलांचा पाय तोडून टाकतो व तुझ्यावर ब्लेडने वार करुन अॅसिड टाकतो,’’ अशी धमकीही आरोपीने दिली. तसेच आरोपीने मोबाईलमध्ये दोघांचे काढलेले खासगी व अश्लिल फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी त्याचा फोन ब्लॉक केला असता त्याने स्रॅपचॅट व इन्ट्राग्राम या सोशल मीडिया अॅपवर फिर्यादीचा पाठलाग करुन तिला शिवीगाळ केली.
आरोपीने इथेच न थांबता फिर्यादीस धमकीचे मेसेजेसही पाठवत असे. तसेच फिर्यादीचे नातेवाईकांना फोन करुन फिर्यादीबद्दल खोटी माहिती देऊन फिर्यादीची बदनामी करीत होता. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.