बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार येथील फळ-भाजी मार्केटमध्ये डाळिंबाला प्रति किलोला २०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला. प्रति क्रेटला १८०० ते ४००० रुपये दर मिळाला. डाळिंबास प्रति किलोस कमाल ९० रुपये व सरासरी १५० रुपये दर मिळाला. संजय गदादे यांच्या आडतीवर पणदरे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी माधवराव कोकरे यांच्या डाळिंबास २०० रुपये प्रति किलो दर मिळाला.
जळोची (ता. बारामती) मार्केटमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, फलटण, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातून आवक होत आहे. आठवड्यातून साधारण ९०० ते १००० क्रेट डाळिंबांची आवक होत आहे. डाळिंब खरेदीसाठी बारामती तालुक्यासह बिहार, कानपूर व दिल्ली येथील खरेदीदार येत आहेत. परराज्यात मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
दरम्यान, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल ग्रेडिंग व सॉर्टींग करून आणल्यास जादा दर मिळेल. समितीने जळोची मार्केटमध्ये उभारलेल्या फळे, भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी सेल हॉल व इतर सुविधांमुळे शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची सोय झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल बारामती बाजार समितीच्या आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी केले आहे.