उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गायरान जागेवर अतिक्रमण करून मोठमोठ्या बंगल्याची कामे सुरु आहेत. हे सर्व ग्रामपंचायतीला माहिती असूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली नसून ग्रामपंचायत मात्र बघ्यांची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे शासनाच्या जमिनी गिळंकृत करण्याचा धोका पुढील काळात उद्भवणार आहे.
कोरेगाव मूळ (ता. हवेली) तलाठी सजा कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान क्षेत्राचा समावेश आहे. वर्षानोवर्ष पडीक असलेल्या या क्षेत्रात तुकडे पाडून निवासाच्या शोधाचा प्रयत्न करीत या शासकीय गायरान जमिनींवर अतिक्रमण होत आहे. या शासकीय जमिनी अप्रत्यक्षपणे अतिक्रमण करून बळकावण्याचा प्रयत्न वाढला आहे.
कोरेगाव मूळ गावठाण हद्दीलगत शासकीय गायरान जमिनी आहेत. यापूर्वीच गायरान जमिनीवर अतिक्रमणे वाढले असताना स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून अतिक्रमणांना प्रतिबंध घालून स्थानिकांचा विरोध झुगारून या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. ग्रामस्थांनी शासकीय गायरानात अतिक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी खबर देऊन तसेच तक्रार देऊन उपयोग होत नसल्याने दररोज नव्याने गायरान अतिक्रमणांची बाधित होत आहे.
कोरेगाव महसूल सजात गट नंबर दोन ब मध्ये एकूण 23 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे. कोरेगाव मूळ ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात पुरंदर उपसा योजना, वीज उपकेंद्रासाठी शासकीय गायरान जागांचा या कामांसाठी समावेश झाला आहे. भविष्यात या ठिकाणी महत्त्वाच्या प्रकल्पासाठी या जमिनीचा वापर होऊ शकतो. परंतु अतिक्रमणे वाढून जमिनी घशात सजत असल्याने ग्रामस्थांनी अतिक्रमणांवर प्रतिबंध तसेच कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, गावाबाहेरील नागरीकांनी अतिक्रमण करून त्यांची घरे थाटली आहेत. रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत देखील नव्याने पत्राशेड मारुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू असताना ग्रामपंचायतीच्या वतीने नोटीस बजावण्यात आली मात्र तरीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरु आहेत.
याबाबत बोलताना कोरेगाव मूळ येथील माजी उपसरपंच विजय कानकाटे म्हणाले, “कोरेगाव मूळ गावामध्ये गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेला आहे. हे अतिक्रमण थांबविणे खूप गरजेचे आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य बॉडी हे बघायची भूमिका घेऊन अतिक्रमणाला सहकार्य करत असून यांच्याच माध्यमातून हे अतिक्रमण घडून येत आहे. गावच्या विकासापेक्षा यांना अतिक्रमणामध्ये जास्त रस आहे. गायरान जमीन ही कोणाही एकाच्या मालकीची नसून सरकारची जमीन असते. ग्रामपंचायतीने त्याचे संरक्षण करणे आवश्यक असूनही संरक्षण करतेच ही जमीन अतिक्रमण धारकांना देत आहेत.
याबाबत बोलताना कोरेगाव मूळचे ग्रामविकास अधिकारी पी. एस पवार म्हणाले, “दोन दिवसांपूर्वीच मी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी पदाचा चार्ज घेतला आहे. यासंबंधी चर्चा करून व माहिती घेऊन सांगतो.