-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. पोषण आहारामध्ये आता अंडी व केळी यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने, जीवनसत्व, कॅल्शियम लोह यासारखे घटक असल्याने विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. या दृष्टीने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश त्याचबरोबर केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्रिस्तरीय पाककृती अंतर्गत निर्धारित केलेल्या पाककृतीमध्ये दोन आठवड्यातून एक दिवस अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात) विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयाचा आहे.
14 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार पुढील दहा आठवड्यांकरता विद्यार्थ्यांना अंडी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या पाच महिने दोन वेळा असे एकूण दहा आठवड्यांकरिता अंडी (अंडा पुलाव या स्वरूपात) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयाची आहेत. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करून देण्यात यावे. शाळांनी नियमित उपस्थितीची नोंद एमडीएम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदवणे आवश्यक आहे.
सध्या अंड्यांचा बाजारभाव लक्षात घेता एका अंड्यासाठी पाच रुपये इतका निधी चार आठवड्यांसाठी अग्रिम स्वरूपात शाळांना देण्यात येणार आहे. तथापि अंडी व केळी करिता शाळांना निधी उपलब्ध होईपर्यंत शाळांनी इंधन व भाजीपाल्याकरीता शाळास्तरावर उपलब्ध असलेल्या निधीमधून सदरचा खर्च भागवण्याचे निर्देशही शासकीय परिपत्रकात दिलेले आहेत.