Gang rape in Dehradun : राज्यासह अनेक भागात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, आत्महत्या यांसारख्या घटना तर घडत आहेत. असे असताना आता उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून डेहराडूनला आलेल्या पंजाबमधील एका तरुणीवर आयएसबीटी बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 13 ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी ही पंजाबमधील रहिवासी आहे. तरुणी मुरादाबादहून यूपी रोडवेजच्या बसमधून प्रवास करत होती. ती 13 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता आयएसबीटी डेहराडूनला पोहोचली. त्यावेळी तरुणी बसमध्ये एकटी असतांना पाच नराधमांनी तिच्यावर बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी मुलीला बसमधून उतरवले व तिला तेथेच सोडून निघून गेले. घटनास्थळी बाल कल्याण समितीच्या बचाव पथकाला ही तरुणी वाईट अवस्थेत आढळली.
या घटनेसंदर्भात एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. एसएसपी यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. त्यांच्या सुचनेवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पिडीत तरुणीने चौकशीदरम्यान सांगितले की, ज्या बसमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला ती बस लाल रंगाची होती. उत्तराखंडच्या रोडवेज बसमध्ये तिच्यावर बलात्कार झाला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा डेहरादून पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.