अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : ता .१७ शिरुर तालुक्यातील पाबळ येथील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौधरी यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत त्यांना यापूर्वी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवलेले असताना उच्चन्यायालयाने देखील त्यांना दणका दिल्याने अखेर पाबळचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौधरी हे अपात्र ठरले आहे.
पाबळ ता. शिरुर येथील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र श्रीरंग चौधरी यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याबाबतची तक्रार माजी सैनिक छगन चौधरी यांनी २०२२ मध्ये केलेली होती. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवले होते. त्यांनतर त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता त्यांनी देखील रवींद्र चौधरी यांना अपात्र ठरवले.
अखेर २०२३ मध्ये रवींद्र चौधरी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने चौधरी यांची याचिका रद्द करत जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश दिले, मात्र यावेळी तक्रारदर माजी सैनिक छगन चौधरी यांनी तक्रार मागे घेतलेली असताना जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीचे शासकीय अहवाल तसेच पुरावे तपासले.
ग्रामपंचायत सदस्य असलेले रवींद्र चौधरी यांच्या सह त्यांच्या वडिलांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. हे सांगत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्वतः दखल घेऊन तक्रारदाराची माघार असताना त्यांच्या अधिकारात शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौधरी यांना सदस्य पदासाठी अपात्र ठरवले आहे.
सदर प्रकारामध्ये अर्जदार यांचा युक्तिवाद ॲडव्होकेट रेश्मा चौधरी, ॲड. संजीव सावंत, ॲड. अभिषेक देशमुख यांनी केला आहे. मात्र उच्च न्यायालयातून देखील दाद न मिळाल्याने ग्रामपंचायत सदस्याचे पद रद्द झाल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.