हर्षल देशपांडे
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पालिका हददीतील पोलिसांना पीएमपीच्या वतीने देण्यात येणारी मोफत बस सेवा काल १५ नोव्हेंबर पासून बंद करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक ओम प्रकाश बखोरिया यांच्या वतीने घेण्यात आला आहे.
यामुळे पीएमपीद्वारे प्रवास करणाऱ्या पोलिसांना पीएमपीचे तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.
पीएमपीचे संचालक ओम प्रकाश बखोरिया पीएमपी व्यवस्थापनाच्या वतीने हे परिपत्रक जाहीर केले असून याद्वारे पोलिसांना आता पीएमपी प्रवासासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
मार्च १९९१ साली दिलेल्या शासन निर्णयानुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पीएमपीमध्ये प्रवास करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नव्हते. ही सेवा पीएमपीने जवळपास ३१ वर्ष पोलिसांना दिली आहे.
या परिपत्रकानुसार पीएमपीतील वाहक, तिकीट तपासनीस व पर्यवेक्षकीय सेवकांना हा या आदेशाची प्रत पाठविण्यात आली असून याची अंमलबजावणी देखील तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परंतु सध्याच्या घडीला पीएमपी ही मोठ्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली असून अनेक मार्गिका तोट्यात जात आहेत. व्यवस्थापन खर्च, खर्च जुन्या वाहनांचा देखभाल खर्च, नवीन गाड्यांची सातत्याने होणारी मागणी आणि नागरिकांकडून मिळणारा थंड प्रतिसाद यामुळे पीएमपीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
सातत्याने वाढणारी शहरांची आणि महानगरपालिकेची सीमा ही देखील पीएमपीच्या व्यवस्थापनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
काही दिवसांपूर्वीच पिपरी चिंचवड हददीतील अनेक मार्गिका पीएमपीच्या वतीने बंद करण्यात आल्या होत्या. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक मार्गिकांना नागरिकांकडून केवळ गर्दीच्या वेळातच प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, त्यानंतरच्या पीएमपी फेऱ्यामध्ये मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असण्याची शक्यता आहे.