शिक्रापूर: वाडागाव पुनर्वसन (ता. शिरुर) येथे सावकाराच्या पठाणी पद्धतीने व्याजाच्या वसुलीला कंटाळून भटू शिवाजी मराठे या इसमाने फेसबुक पोस्ट टाकून तसेच चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष रामदास माळी (रा. कोरेगाव भीमा) या सावकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील भटू मराठे (वय ५४ रा. वाडा पुनर्वसन) यांनी त्यांचे खोली मालक असलेल्या संतोष माळी याच्याकडून ७० हजार रुपये व्याजाने घेतले होते. संतोष हा भटू यांना व्याजासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. त्यामुळे भटू मराठे यांनी १५ ऑगस्ट रोजी फेसबुकवर पोस्ट टाकत संतोष माळी याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगत राहत्या घरात गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी भटू यांच्या खिशात सचिन माळी याच्या त्रासामुळे गळफास घेत असल्याबाबतची चिठ्ठी मिळून आली. घनश्याम भटू मराठे (वय २५ रा. सिल्व्हर नेस्ट सोसायटी वाडागाव पुनर्वसन) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.