मुंबई : बालदिनानिमित्ता राज्य सरकारने राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पोषक कार्यक्रम सुरू केला आहे.राज्य सरकार आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने ‘एक संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शासकीय निवासस्थानी करार करण्यात आला.
इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्स (आयएपी) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार शासकीय शाळांमधून बालकांच्या आरोग्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाअंतर्गत असंसर्गजन्य (एनसीडी) आजारांकडेही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
३ ते ९ आणि १० ते १८ वर्षे अशा दोन वयोगटांतील मुलांसाठी असलेल्या कार्यक्रमाअंतर्गत पोषक आणि संतुलित आहार, दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व, स्क्रिनटाईम म्हणजेच मोबाईल-टीव्हीपासून दूर राहण्याच्या युक्त्या इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १० ते १८ वयोगटातील मोठ्या मुलांसाठी मानसिक स्वास्थ्य आणि विविध प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहेत.