अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील पारोडी येथील सुपुत्र योगेश पोपट टेमगिरे हे सैन्य दलातून वीस वर्ष देशाची सेवा बजावून निवृत झाले असून त्यांचे गावात स्वागत करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांचा मोठा जनसागर लोटला होता.
देशसेवेसाठी प्रेरणा
योगेश यांनी सांगितले की, पारोडी गावातून प्राथमिक शिक्षण घेतले व पाचवी ते बारावीचे शिक्षण निमगाव महाळुंगी येथे घेऊन 29 डिसेंबर 2004 रोजी त्याची सैन्यदलात निवड करण्यात आली. बेळगाव या ठिकाणी त्याची ट्रेनिंग पूर्ण झाली, त्यानंतर त्यांनी पुणे, जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तराखंड, केरळ या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत देश सेवा केली.
ते हवालदार युनिट-23 मराठा लाईट इनफन्ड्री या पदावरून नुकतेच सेवानिवृत झाले. योगेश हे सेवानिवृत होऊन गावात दाखल होताच जहाज पथक आतिषबाजी, पुष्पवृष्टि करून स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी योगेश यांचे औक्षण केले.
या वेळी गावातील व पंचक्रोशीतील थोर मोठ्यांनी देश सेवेसाठी प्रेरणा तसेच देश सैनिकांबाबत आदर निर्माण व्हावा या हेतून ग्रामस्थांच्या वतीने सदर मिरवणुक काडून विठ्ठल रुक्माई व मारुती मंदिराचे दर्शन आरती घेतली. त्यानंतर योगेश टेमगिरे यांच्या निवासस्थानी सहा ते साडेसात या वेळेत कीर्तनकार ह. भ . प. प्रा. नवनाथ महाराज माशेरे झी टॉकीज फेम याचे देश सेवेवरती उत्कृष्ट असे किर्तन झाले. त्यानंतर साडेसात ते आठ या वेळेत सेवानिवृत्त टेमगिरे यांचा सत्कार समारंभ व भोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे.