मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मागणीसाठी डॉक्टर संपावर आहेत. असे असतानाच सायन रुग्णालयातील ऑन कॉल निवासी डॉक्टर वसतिगृहाकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याचा पाठलाग केला. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे निवासी डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची तक्रार सायन पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सायन रुग्णालयातील रात्रीच्या शिफ्टमध्ये ऑन कॉल असलेला निवासी डॉक्टर काही कामानिमित्त रात्री दोनच्या सुमारास नवीन निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाकडे चालला होता. एका कारमधून दोन अज्ञात व्यक्ती त्याचा पाठलाग करू लागले. त्याने एका मेडिकल दुकानामध्ये आसरा घेतला. काही वेळानंतर पुन्हा वसतिगृहाकडे जाण्यासाठी पुन्हा निघाला. तेव्हा ते दोघे पुन्हा पाठलाग करत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरने पालिकेच्या सुरक्षा रक्षक पथकातील कदम यांची मदत घेतली. सायन पोलीस ठाण्याचे ठोंबरे घटनास्थळी दाखल झाले.
डॉक्टरांकडून माहिती घेऊन त्याला सुरक्षितपणे वसतिगृहात सोडण्यात आले. महाविद्यालयाच्या कॅम्पस बाहेर असलेल्या नवीन आरएमओ वसतिगृह, शिवडी येथील अश्वमेध वसतिगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टरांची रात्री-अपरात्री कॉलवर असताना ये-जा सुरू असते, पण या घडलेल्या प्रकारामुळे सर्व निवासी डॉक्टर चिंतेत आहेत. काही डॉक्टरांनी रात्री ड्युटीवर जाण्यास नकार देत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबतची तक्रार सायन पोलीस ठाण्यात नोंदवली आणि महिला पोलीस निरीक्षक शिर्के यांनी या भागात रात्रीचे पेट्रोलिंग वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.