लोणी काळभोर : विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला नागरीक चांगल्या भावनेने बघतात. देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. मात्र, याच विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील लोणी काळभोर मध्ये मागील दहा दिवसापूर्वी आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती.
ही घटना ताजी असतांनाच आता दोन अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यांच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. १५ ऑगस्ट) उघडकीस आला आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी पिडीत मुलींनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना एका तासाच्या आत ताब्यात घेतले आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या विनयभंगाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत अल्पवयीन मुलगी शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी गुरुवारी (ता. १५) सकाळी चालली होती. तेव्हा आरोपी विद्यार्थिनीला शाळेत सोडवतो असं म्हणून गाडीत बसविले.
विद्यार्थिनी गाडीत बसल्यानंतर आरोपीने गाडी शाळेत नेण्याऐवजी एका निर्जन ठिकाणी नेली. आणि अल्पवयीन मुलीला प्रेमाचा इजहार केला. मात्र, पिडीतेने त्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पिडीतेसोबत लगट करून बळजबरी करू लागला. तसेच पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तवणूक केली. त्यानंतर दोन ते तीन तासानंतर आरोपीने पिडीतेला सोडून दिले.
दुसऱ्या घटनेत, फेब्रुवारी महिन्यात पिडीत विद्यार्थिनी एकटीच शाळेत चालली होती. तेव्हा आरोपीने रस्त्यातच विद्यार्थिनीचा पाठलाग करून रस्त्यावर अडवून तिची छेडछाड केली. त्यानंतर आरोपी वारंवार पिडीतेला त्रास देऊन विनयभंग करीत होता. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने शाळेत जाने बंद केले होते. त्यानंतर विद्यार्थिनीच्या घरच्यांनी विश्वासात घेऊन अधिक माहिती घेतली असता, सदर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडीतेसह तिच्या आईवडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपीच्या विरोधात तक्रार दिली.
याप्रकरणी दोन्ही मुलींनी तक्रार दिल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना एका तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.
दरम्यान, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्त्या करून कठोर कायदा करण्यात येत असला, तरीही विकृत मनोवृत्तीवर उपाय नसल्याने पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर देशभर महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे देशाच्या ७८ वर्षांच्या अमृतमहोत्वासानंतरही महिला व मुली अजूनही सुरक्षित नाहीत का? असा सवाल तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.