लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गावठी हातभट्टीची दारु विक्री करणारा आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील सराईत गुन्हेगार शामकांत विष्णु सातव याला संपुर्ण पुणे जिल्ह्यातून दीड वर्षाकरीता (18 महिने) तडीपार केले आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 04, पुणे शहर यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1) (अ) (ब) प्रमाणे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली व आव्हाळवाडी परिसरात शामकांत विष्णु सातव हा दहशत निर्माण करुन सामान्य नागरिकांना वारंवार त्रास देत होता. त्यामुळे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवू नये. तसेच सदर सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा, या उद्देशाने शामकांत सातव याच्यावर येरवडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुन्हेगारावरील दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांना पाठविला होता. त्यानंतर विजयकुमार मगर यांनी गुन्हेगाराला पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दीड वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सदरचा तडीपार इसम हा पुणे जिल्ह्याच्या परिसरात आढळून आल्यास त्याची माहीती लोणीकंद पोलिसांना 9527069100 या मोबाईल क्रमांकावर देण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी केले आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय झुरुंगे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी केली आहे.