Politics : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात तयार आहेत. अशातच सद्या अजित पवार सुद्धा आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेले दिसून येत आहेत. अशातच त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. “माझी स्पर्धा शरद पवारांशी नाही”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शरद पवारांशी माझी स्पर्धा नाही, असं विधान केलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार..
अजित पवार म्हणाले, आम्ही अडीच वर्ष शिवसेनेसोबत सरकार चालवलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. पक्षाने मला उपमुख्यमंत्री बनवलं होतं. कोरोना काळात आम्हाला अनेक कामं करावी लागली होती. आम्ही अडीच वर्ष सोबत काम केलं आहे. एकनाथ शिंदेही त्यावेळी सोबत होते. ते मंत्री होते. आम्ही परदेशीच्या मुद्द्यावरुन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. त्यानंतर लगेच निवडणुका झाल्यानंतर आम्ही काँग्रेस सोबत आघाडी केली. आम्ही 15 वर्ष एकत्रित होतो, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्र लढत होतो. शरद पवार आमच्या पक्षाचे प्रमुख नेते होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी स्थानिक आमदारांना अधिकार देण्यात येत होते. त्यामुळे आताही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
निवडणुकीत अल्पसंख्यांकांची मतं मिळाली नाहीत..
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, या निवडणुकीत अल्पसंख्यांकांची मतं आम्हाला मिळाली नाही. आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला. तर ते आम्हाला म्हणाले की, आमच्या समाजात मेसेज होता की, सीएए हा जो नवीन कायदा आणला आहे. हा कायदा आम्हाला बाहेर काढण्यासाठी आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी करण्यात आला. हिंदू राष्ट्र केल्यानंतर आमचा मतदानाचा अधिकार काढण्यात येईल. असं त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या हाय कमांडशी चर्चा करावी लागते..
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भाषणं करणारे लोक होतो, त्यांनी सर्वांनी ठरवले होते की, एका लाईनने जायचे आहे. एकनाथ शिंदे, मी आणि देवेंद्र फडणवीस बसलो होतो. आम्ही कशा पद्धतीने पुढं जायचं हे ठरवलं होतं. माझ्या पक्षात आणि शिंदेंच्या पक्षात आम्ही दोघंच निर्णय घेतो. आमच्या पक्षातील बऱ्याच जणांनी अनेक वर्षांपासून एकत्रित काम केलंय. देवेंद्र फडणवीसांची पार्टी देशातील सर्वात मोठी पार्टी आहे. त्यांना इथे चर्चा केल्यानंतर त्यांच्या हाय कमांडशीही चर्चा करावी लागते, असं सुद्धा अजित पवार यावेळी म्हणाले.