पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. रिक्षास्टँडवर रांगेत उभे असलेले पॅसेंजर घेण्यावरुन दोन रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या हाणामारीमध्ये एकाने दुसर्याला धक्काबुक्की करत ढकलून दिल्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला.
या प्रकरणी दिपक हनुमंत जाधव (वय- ४४, रा. पीएमसी कॉलनी, गोखलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा जाधव (वय- ४२, रा. वैदुवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सेनापती बापट रोडवरील पॅव्हेलियन मॉल गेटवर रविवारी रात्री ११ ऑगस्ट रोजी साडेनऊ च्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेजण रिक्षाचालक आहेत. फिर्यादी हे रिक्षास्टँडवर रिक्षामध्ये पॅसेंजर घेण्यासाठी रिक्षा नंबरला लावून थांबले होते. त्यावेळी कृष्णा जाधव याने फिर्यादीचे रिक्षाजवळ येऊन आम्ही येथे कशाला थांबलो आहे, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, तेव्हा फिर्यादीने आपल्या रिक्षातून खाली उतरवून पॅसेंजर तुझ्या रिक्षात घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर कृष्णाने फिर्यादीला मारहाण करुन जोरात धक्काबुक्की केली. फिर्यादी यांना रस्त्यावर जोरात ढकलून दिल्याने ते रस्त्यावर कोसळले. खाली पडल्याने त्यांच्या डाव्या हाताचे मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस नाईक दहातोंडे तपास करीत आहेत.