मुंबई : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागेल आहेत. त्यासोबतच राज्यात एकच चर्चा आहे, ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेची. महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात केली. सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसत आहेत. अशातच लाडकी बहिण योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने विशेष अभियान हाती घेतलं असून यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राखी पौर्णिमेच्या निमित्तानं राज्याच्या लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधणार आहेत. या बाबतची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा राज्यातील बहिणींशी संवाद..
स्त्रीसक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना आणि उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष आणि सरकारद्वारे आम्ही करत आहोत. येत्या राखी पौर्णिमाला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली आहे. सोबतच राज्यातील सर्व माता-भगिनींना विनंती करत सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन देखील या पोस्ट मधून केले आहे.