लोणी काळभोर, (पुणे) : कोलवडी येथे घरफोडी करून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने अटक केली आहे. शनिवारी (ता. 10) रात्री आव्हाळवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीतील निळकंठेश्वर मंदिराजवळ हि कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण (वय 19 वर्षे रा. कॅनॉलजवळ, तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी वानवडी, चंदननगर, हडपसर, भारती विदयापीठ या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकुण 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा, युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे युनिट 6 च्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त घालीत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे महेश चव्हाण हा आव्हाळवाडी गावच्या हद्दीत निळकंठेश्वर मंदिराजवळ, मोकळ्या मैदानात थांबलेला आहे.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. यावेळी परिसरात महेश चव्हाण हा संशयितरीत्या थांबलेला दिसून आला. यावेळी पोलिसांना पाहुन तो पळुन जावु लागताच त्याला शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले.
यावेळी त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याचे खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथिदारांसह कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी केल्याचे सांगितले. आरोपी महेश चव्हाण याच्याकडून पोलिसांनी 2 लाख 45 हजार रुपये किमतींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच सदरचे सोन्याचे दागिने हे कोलवडी व कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची माहिती दिली असल्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपी महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी वानवडी, चंदननगर, हडपसर, भारती विदयापीठ या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकूण 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा, युनिट 6 चे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.