पुणे : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. असे असताना आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बोरिबेल येथे जावयाने काही किरकोळ कारणावरुन सास-याचा खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लकझऱ्या कोब्या काळे (रा, लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रहीना बाबूजी चव्हाण हिने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लकझऱ्या काळे हा बोरिबेल येथे त्याच्या सासरवाडीत आला होता. त्यावेळी फिर्यादी रहीना चव्हाण यांचे सासरे सुदाम हिऱ्या चव्हाण यांनी तुझे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो आणि तू आमच्या घरी येऊन जेवतो, असे म्हणून लकझऱ्याला शिवीगाळ केली. तसेच शिवीगाळ केल्यानंतर हातात असलेला दगड फेकून मारला.
या मारहाणीत लकझऱ्याला फिर्यादीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु लकझऱ्या त्याच्याजवळ असणाऱ्या मोठ्या चाकूने सासऱ्याच्या छातीमध्ये जोरात चाकू खुपसला. यावेळी सुदाम चव्हाण याला यात गंभीर जखम झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध झाला. दरम्यान लकझऱ्या येथून पसार झाला.
या घटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या सुदाम चव्हाण यांना त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत दौंड येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. दरम्यान उपचारादरम्यान डॉक्टरांनी सुदाम चव्हाण यांनान मृत घोषित केले. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेला आरोपी लकझऱ्या काळे याचा पोलीस शोध घेत आहेत.