प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी झटत असतो, धडपडत असतो. अहोरात्र कष्ट करत असतो. आपल्या प्रयत्नांना यश आलं तर आपण आनंदी होतो. पण जर का नाही आलं तर मात्र दुःखी होतो. आपल्याला कळत नाही की आपण कुठे चूक केलेली आहे. मग त्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप होतो. असं का घडतं कारण आपण जे काही प्रयत्न करतो त्याच्यामध्ये अपेक्षा असते, त्याच्यामध्ये सहजता नसते. आनंद नसतो, म्हणून आपल्याला अपेक्षा भंगाच दुःख हे जास्त होत .
आज आपण बघणार आहोत एक पालक म्हणून आपल्या पाल्याच्याप्रती आपली काय भूमिका असली पाहिजे. त्याचे संगोपन करताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ज्यावेळेस आपण पालकत्व करतो, त्यावेळी आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतो. त्यावेळेला या पालकत्वामध्ये सहजता हवी, आनंद हवा. आनंदाने जर तुम्ही काही गोष्टी करता, तर नक्कीच ते मूल खूप चांगल्या प्रकारे आपण वाढवू शकतो. बऱ्याचदा असंही घडतं की, त्याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा असते की मी ही गोष्ट करत आहे. मला असं काहीतरी रिझल्ट मिळाला पाहिजे, म्हणून आपली अपेक्षा असते. कधीकधी फार बेफिकिरी पाहायला मिळते, की ठीक आहे. मुलांकडे फार लक्ष नाही दिलं तरी चालते. तसेही ते लहानाचे मोठे होणार आहेत. कधी कधी असं पाहायला मिळतं, की दिवस आणि रात्र त्या मुलांना आईचा धाक असतो. आपण ही पॅनिक असतो, बेचैन असतो आणि त्या मुलालाही स्वस्त बसू देत नाही. अशा कोणत्याही प्रकारचा आताताईपणा चुकीचा आहे. आपण ज्यावेळेस आपलं मूल वाढवत असतो त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे.
योग्य वेळेला योग्य कृती घडली पाहिजे. योग्य वेळेला त्या मुलाला साथ देणं हे आपलंच कर्तव्य आहे. प्रेमळ वातावरण निर्मितीत करणे महत्त्वाचे आहे. तुम्हीही आनंदी राहा व मुलालाही आनंदी राहू द्या, बऱ्याचदा मुलांच्या डोक्यावर अपेक्षांची टांगती तलवार असते. मग कुठे मार्क कमी पडलेत. कुठे एखाद्या स्पर्धेत नंबर नाही मिळाला. तर त्यावेळेला मुलाला स्पर्धेचा आनंद घेणे दूर पण त्या स्पर्धेत नंबर कसा मिळेल याचं टेन्शन त्या मुलाला पालकांकडून असते. त्यामुळे पालक म्हणून आपली एक भूमिका आहे. आपलं मूल कालपेक्षा आज कसं चांगलं होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा.
तुम्ही अजिबात तुमच्या पाल्याची इतरांशी तुलना करू नका. अपेक्षांचे ओझं त्यावरती ठेवू नका. तुमच्या आयुष्यामधील जगातलं सगळ्यात अनमोल मूल जन्माला आलेलं आहे. एकमेव आहे. अद्वितीय आहे . जगात एवढी लोकसंख्या आहे, पण तुमच्या पाल्यासारख कोणतही मूल नाही. तुम्ही स्वतः सुद्धा एकमेव अद्वितीय आहात. तुमच्यासारखी कोणीच व्यक्ती नाही. त्यामुळे मुलांचे संगोपन करताना आपल्या बाळातले जे चांगले गुण आहेत ते जन्मजात कलागुण आहेत. ती ताकद आहे अधिकाधिक कशी वाढेल याकडे आई-वडिलांनी लक्ष दिले पाहिजे.
स्वामी विवेकानंदांची एक कथा तुमच्या सोबत शेअर करायला मला आवडेल. त्या कथेचा सर्व पालकांनी सकारात्मकतेने विचार करावा.
स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे नाव नरेंद्र. त्यांचे वडील वकील होते. वडिलांना नेण्यासाठी रोज एक बग्गी यायची. स्वामी विवेकानंदांना ती बग्गी खूप आवडायची. एकदा अशीच सर्व मुलं हॉलमध्ये बसलेली असताना सहजच त्यांचे वडील त्या मुलांना प्रश्न विचारतात. “बाळांनो तुम्हाला मोठे झाल्यानंतर काय व्हायचं आहे? ” “प्रत्येक जण सांगतो, कोणी डॉक्टर, कोणी वकील, अजून वेगवेगळ बरंच काही.”, परंतु स्वामी विवेकानंद मात्र त्यांची पहिल्यापासून उत्सुकता असते, त्या बग्गीच्या कोचवानाची, ते म्हणतात ” मला कोचवान व्हायचं आहे.” मग सगळी मुलं हसायला लागतात.
त्या सगळ्या गोष्टी स्वामी विवेकानंदांची आई भुवनेश्वरी बघत असते. त्या विवेकानंदांच बोट धरून आतल्या खोलीत घेऊन जाते. खोलीमध्ये कुरुक्षेत्रावरील गीता सांगणाऱ्या कृष्णाच आणि अर्जुनाच चित्र लावलेलं असतं. चित्राकडे बोट करून भुवनेश्वरी नरेंद्रला सांगते. “बाळ, तुला कोचवान व्हायचं असेल, तर नक्की हो, पण तू श्रीकृष्णासारखा सारखी सारथी हो जो जगाला मार्ग दाखवेल.”आणि खरंच आईच्या या बोलण्यामुळे स्वामी विवेकानंदानी आध्यात्मिक क्षेत्रात मोठं काम केलं. अनेक लोकांचे जीवन रथ योग्य दिशेने कसा न्यायचा यासाठी त्यांनी सर्वांना मार्ग दाखवला.
पालकांनो तुम्हाला कल्पना नसेल, या जगाला मार्ग दाखवणारी एक दिव्यशक्ती, एक प्रचंड शक्ती, तुमच्या सानिध्यात मोठी होत आहे. माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना घडविले व शिवरायांनी जनतेचे स्वराज्य घडविले.
श्यामची आई हे पुस्तक आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलंही असेल. छोटासा श्याम आईच्या प्रेमामुळेच, आईच्या शिस्तीमुळेच साने गुरुजी बनले आहेत.
मला असं वाटतं, की तुमचं मूल या जगामध्ये प्रचंड मोठी कामगिरी करू शकते. तो आत्मविश्वास तुम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करा, त्याला तुम्ही इतरांसारखे बनवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यातले जे सुप्त गुण आहेत, त्याच्यातील जी जन्मजात शक्ती आहे. ती अधिक अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा. मग बघा एक दिवस तुम्हाला सुद्धा तुमच्या पाल्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मित्र परिवाराबरोबर, नातेवाईकांना बरोबर नक्की शेअर करा.
– मच्छिंद्र नवनाथ साळुंखे,
एम. ए. क्लिनिकल सायकॉलॉजी स्पेशल, बी.एड. अध्ययन अक
मो.9673734261.