धाराशिव : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा केला आहे.
नेमकं काय घडलं?
राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी घुसून गोंधळ घालत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे. मराठा समाजाला ओबिसीतून आरक्षण पाहिजे आहे, त्यामुळे नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यासाठी कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्येच ठिय्या मांडला होता. याबाबत आता राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आरक्षणावर काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज सकाळी ते सोलापुरात होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, राज्यात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.