यवत : आजपासून श्रावण महिना सुरू होत असून श्रावण महिन्यातील सोमवार हा शिवभक्तांसाठी ही एक वेगळी पर्वणी असते. यामुळे राज्यभरातून भाविकांनी आज दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सीमेवरील वसलेल्या श्री क्षेत्र भुलेश्वर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे परिसरात सर्वत्र हर हर महादेव चा गजर सुरु होता.
श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात रात्री १२ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे पाचच्या सुमारास शिवलिंगावर रुद्राभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी शिवलिंगावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. तर मंदिर परिसरात व प्रवेश दारावर फुलांची आरास करण्यात आली होती. दुपारी १२ च्या सुमारास श्रींची मूर्ती वाजत गाजत पाण्याच्या कुंडावर नेत जलाभिषेक करत ‘हर हर महादेव’च्या गजरात पालखीमध्ये ठेवण्यात आले.
गुलाबाची उधळण करत हलगीच्या तालावर, शिवनामाच्या भक्तीत तल्लीन होत खांद्यावर कावड घेत मानाच्या कावडींनी वरुण राजाच्या साक्षीने मंदिराच्या प्रवेशद्वारावर धार घातली, कावड यात्रेत तरुणांसह वृद्धांनी देखील मोठ्या प्रमाणात पारंपारिक खेळ खेळत सहभाग घेतला. दर्शनासाठी दर्शन रांग केली असल्याने भाविकांनी शांततेत दर्शन घेतले, यावेळी अनेक भाविक भक्तांकडून फराळाचे व अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, माळशिरस यांच्यावतीने आरोग्य कक्ष उभारला होता. मंदिराकडे येणारी वाहने वन विभागाच्या प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आली असल्याने मंदिर परिसरात वाहतूक कोंडीतून भाविकांची सुटका झाली. यावेळी यवत रस्त्यावर लहान-मोठे पाळणे लागल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. तर वन विभागातून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर व मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटली होती.