पुणे : गुंड निलेश वाडकर याच्या पत्नीने भिशीतील व्यवहाराच्या कारणावरुन तरुणाला बोलावून घेऊन त्याचे अपहर करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
ही घटना आंबेगावातील स्वामी नारायण मंदिर येथील चौपाटीवरील हॉटेल समोर ते कात्रज जुना बोगद्याकडे जाणार्या रोडवर शनिवारी (ता. १२) रोजी सायंकाळी घडली आहे. याप्रकणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
विनायक तानाजी लोंढे (वय ३०, रा. रामटेकडी) असे फिर्याद दिलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यानुसार गुंड निलेश वाडकर याच्या बायकोविरुद्ध आणि तिच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड निलेश वाडकर याच्या बायकोने फिर्यादीसोबत व्हॉटसअॅप चॅटीग करुन त्यांना स्वामी नारायण मंदिराजवळ बोलावून घेतले.
विनायक तानाजी लोंढे तेथे आले असताना त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हत्याराचा धाक दाखविला. जबरदस्तीने गाडीवर बसवून मुंबई बंगलोर महामार्गाने जुना कात्रज बोगद्यापासून आडबाजूला घेऊन गेले.
दरम्यान त्या ठिकाणी गुंड निलेश वाडकर याच्या बायकोच्या साथीदारांनी ‘तुला बायकांना फसवायला पाहिजे, थांब तुझ्या गुप्तांगाची कातडी काढून टाकतो,’ असे म्हणून हत्यार फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कर्चे करीत आहेत.