पुणे : दरवर्षी पाऊस सुरु झाला की पुण्यात सर्वांचे लक्ष असते ते भिडे पूलाकडे कारण भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुणेकरांना चांगला पाऊस झाला असे वाटत नाही. पुण्यात खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण भरले आहे. अशात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
पुण्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाकडून पुणेकरांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणारा धरणं काटोकाट भरली आहेत. नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. खडकवासला धरणातून आता विसर्ग आणखी वाढणार आहे. तसेच शांतीनगर आणि येरवडा परिसरातील जवळपास 400 ते 500 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.