पुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. बहुतांश भागात मुसळधार पाउस होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यात मुसळधार पावसाची हवामान विभागाकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात यलो अलर्ट..
दरम्यान, आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच ठाणे, पालघरसह पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईह उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात सर्वच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नागरिकांना ‘हे’ आवाहन
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर असून धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त, संबधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवीर नागरिकांच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. गरज भासल्यास एनडीआरएफची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग..
खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स तर चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.