पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोर्शे अपघात प्रकरणात वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात मद्यधुंद अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती समोर आली आहे.
पोर्श अपघात प्रकरणात ९०० पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात नुकतेच दाखल करण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आले. ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात डॉ. अजय तावरे याच्या आदेशानुसार डॉ. श्रीहरी हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरच्या मदतीने रक्ताचे नमुने बदलले आहेत.
त्यावेळी तेथे काही पोलिसही उपस्थित असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. तसेच आरोपींची संख्या, त्यांचा सहभाग, त्याबाबत साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे याबाबतची माहिती देखील आरोपपत्रात देण्यात आली आहे.
कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करणे तसेच चालकावर दबाव आणून खोटा जबाब द्यायला लावणे, त्याला डांबून ठेवणे, याप्रकरणी अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पोर्शे मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल केले आहे.