लोणी काळभोर, (पुणे) : माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण ताजे असतानाच, आता व्हॉटसॲपच्या ‘डिपी’ ला भारतीय राजमुद्रेचा फोटो वापरुन, पोलिस खात्यात मोठे अधिकारी (आयएएस ऑफिसर) असल्याचे सांगत, वडकी परीसरात दरमहा 10 ते 15 टक्के व्याजदराने खाजगी सावकारी करणाऱ्या महिलेला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी व शर्तींवर जामीन मंजुर केला आहे. हे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस जी बर्डे यांनी दिले आहेत.
रेणुका ईश्वर करनुरे (वय-32 वर्षे, रा. सिध्दीविनायक सोसायटी, वडकी, ता. हवेली) असे जामीन मंजूर झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पुजा प्रविण मोरे (वय-31 वर्षे, रा. श्री सिद्धीविनायक पार्क वडकी) यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातील लॉकडाऊनच्या काळात पुजा मोरे यांनी आरोपी रेणुका करनुरे यांच्याकडून 2 लाख 68 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर पुजा मोरे यांनी व्याज व मुद्दल असे मिळून रेणुका करनुरे यांना 8 लाख रुपये दिले होते. कर्ज घेतलेल्या रकमेच्या तिप्पटहुन अधिक रक्कम मिळुनही, आरोपी करनुरे यांनी मोरे यांच्याकडे आणखी साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र मोरे यांची परिस्थिती बेताचीच असल्याने, मोरे यांनी एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिला होता.
दरम्यान, मोरे यांच्याकडून पैसे मिळत नसल्याचे लक्षात येताच, आपण पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत करनुरे यांनी मोरे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच स्वतःच्या मोबाईलमधील व्हॉटसॲपच्या “डिपी” ला असलेला भारतीय राजमुद्रेचा फोटो दाखवुन, पोलिस खात्याची धमकी देण्यास सुरुवात केली.
या धमकीला घाबरुन अखेर पुजा मोरे व त्यांच्या कुटुबिंयांनी थेट लोणी काळभोर पोलिसात धाव घेतली. त्यानंतर रेणुका करनुरे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम या कायद्याखाली खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी रेणुका करनुरे यांना बेड्या ठोकल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात आरोपी रेणुका करनुरे यांनी अॅड. छत्रसाल ताकवले यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्यात अॅड. छत्रसाल ताकवले यांनी आरोपी महिलेने कधीही त्या आयएएस आहेत. अशी बतावणी केलेली नाही, अथवा त्यानी कोणतीही रक्कम व्याजाने दिलेली नाही, तसेच फिर्यांदी यांनी सांगितल्याप्रमाणे एफ आय आर मधील रकमांच्या तपशिलामध्ये तफावत आढळून येते. हे केलेले युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रेणुका करनुरे यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी व शर्तींवर जामीन मंजुर करण्यात आला आहे. हे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस जी बर्डे यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात अॅड. छत्रसाल ताकवले यांना अॅड. विराज करचे पाटील, अॅड. छत्रसाल ताकवले, अॅड. प्रणय सावंत, अॅड. संकेत जगताप, अॅड. महेश उंद्रे यांचे विशेष योगदान मिळाले.