पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली खरी परंतु राज्यावर अजूनही पावसाचे सावट कायम आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणसह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पवासाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार बघायला मिळत असून त्यामुळे अजूनही थंडीची प्रतीक्षा कायम आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होऊ शकतो. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढत आहे.परंतु, हवामान विभागाने आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदा पावसाळा हा लांबला आहे. त्यामुळे आता पाऊस थांबून कडाक्याची थंडी पडणे आवश्यक आहे. जर थंडी पडली तरच झाडांना मोहोर येऊन पुढे फळधारणा होणार. त्यामुळे आंबा, काजू आणि इतर बागायतदारांना आता कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.