पुणे : मान्सून आता परतीच्या वाटेने निघाला असून राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. आजपासून पुढील ४ दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या ४ दिवसापासून नंदुरबारमध्ये थांबून असलेला परतीचा पाऊस येत्या २-३ दिवसात म्हणजे १० ऑक्टोबरदरम्यान कदाचित तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यात तर खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाडा क्षेत्रात मात्र तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा, तसेच चंदीगड दिल्ली, राजस्थानच्या सर्व भागातून माघार घेतली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातूनही मान्सून माघारी परतला आहे.
गेल्या ४ दिवसापासून नंदुरबारमध्ये खिळलेला परतीचा पुढील ४८ तासांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. हीच बाब लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच गुरूवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.