पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाने बरेच दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार सुरूवात केली आहे. पुणे शहर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लोणावळा परिसरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान लोणावळा परिसरात 73 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यंदाची ही उच्चांकी नोंद ठरलेली आहे.
कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. काल सकाळी 8 ते आज सकाळच्या 8 या 24 तासांत 92 मिलीमीटर पाऊस कोसळला होता. मात्र, आज सकाळी पावसाने कहर केल्याचं दिसून आलं आहे. अवघ्या नऊ तासांत 73 मिलीमीटर बरसत, यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. या मोसमात आत्तापर्यंत 1342 मिलीमीटर पाऊस बरसला आहे.
पर्यटकांची मोठी गर्दी…
गेली आठवडाभर ओढ देणारा पाऊस(Rain) कालपासून पर्यटननगरी लोणावळ्यात बरसू लागला आहे. त्यानंतर वर्षाविहारासाठी शहर परिसरात असलेले धबधबे आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. यामुळे विक एंडला या भागात मोठ्या पर्यटक येत आहेत. पुणे शहर परिसरासह घाटमाथ्यावरील काही भागामध्ये आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी घाटमाथ्यावर वर्षाविहारासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
‘या’ भागात आज पावसाची शक्यता?
मुंबईत काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळपासूनच मुंबईत पावसाने हजेरी लावली. कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.