Weather : महाराष्ट्रात सध्या हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यावर एकाच वेळी 3 संकटं वादळी वारे, गारपीट आणि उष्णतेची लाट घोंघावत आहेत. 22 मार्च रोजीही या तिहेरी परिस्थितीचा प्रभाव कायम असून, कोकण ते विदर्भ हवामानात मोठे चढ-उतार दिसत आहेत.

कोकणात उष्णतेचा जोर वाढू लागला आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात तापमान 36 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वाढती आर्द्रता (humidity) यामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. 22 मार्चला कोणताही मोठा इशारा नसला तरी 23 मार्चपासून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर येथे सध्या तापमान 34 ते 37 अंशांच्या दरम्यान आहे. दिवसा कडक उन्हाचा तडाखा असला तरी काही ठिकाणी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या सरींची शक्यता आहे. विशेष म्हणजे, 1-2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून पुन्हा अवकाळी पावसाचा जोर वाढू शकतो.
मराठवाड्यातही हवामान अस्थिर आहे. गेल्या आठवड्यात वादळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता काही भागात कोरडे वातावरण आहे. मात्र 1-2 दिवसांत पुन्हा वादळी वारे, पाऊस आणि गारपीट परतण्याची शक्यता आहे. तापमान 35 ते 38 अंशांच्या दरम्यान राहील.
विदर्भात परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. येथे तापमान 36 ते 39 अंशांपर्यंत पोहोचत असून उष्णतेची तीव्रता वाढली आहे. काही भागात ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची शक्यता कमी आहे. मात्र 2 दिवसांच्या ब्रेकनंतर अवकाळी पावसाचा धोका पुन्हा वाढणार आहे.
उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागात कोरडं आणि उष्ण हवामान कायम आहे. तापमान 35 ते 37 अंशांच्या आसपास राहील. पावसाची शक्यता जवळपास नाही, त्यामुळे उकाडा अधिक वाढणार आहे.
बदलत्या वाऱ्यांच्या दिशा, वातावरणातील आर्द्रतेत वाढ आणि पश्चिमेकडून येणाऱ्या हवामान प्रणालींमुळे हा अस्थिरपणा वाढला आहे. यंदा राज्यात 4 वेळा उष्णतेची लाट आली असून पुढील 2 दिवसांत तापमान आणखी 2 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम सर्वसामान्यांवर आणि शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. अचानक येणाऱ्या गारपीटीमुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं, तर उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी पिणं, दुपारी 12 ते 3 दरम्यान बाहेर जाणं टाळणं आणि हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.







