पुणे: महाराष्ट्र सध्या हवामानाच्या एका विचित्र चक्रात अडकला आहे. राज्याच्या एका टोकाला विदर्भ उन्हाच्या झळांनी होरपळत असताना, दुसऱ्या टोकाला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या तापमानात मोठे चढ-उतार होत असून पुढील काही तास अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सध्या उन्हाचा कहर सुरू आहे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात पारा 44 अंशांच्या पलीकडे गेल्याने रस्ते दुपारच्या वेळी ओस पडत आहेत. याउलट, पुणे, नाशिक आणि साताऱ्यात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिवमध्येही पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, पावसाचे वातावरण पाहता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी आपली काढलेली पिके सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







