Loni kalbhor : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील हर्षद शांताराम शिंदे यांनी एव्हिएशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांचा अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) मार्फत “सर्टिफाइड ऑडिटर” घडविण्यासाठी 13 दिवसांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात एव्हिएशन सिक्युरिटी नियम, जोखीम मूल्यांकन, ऑडिट प्रक्रिया तसेच प्रात्यक्षिक अंमलबजावणी यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
प्रशिक्षणानंतर घेण्यात आलेल्या कठोर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी किमान 80 गुण आवश्यक होते. मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या या प्रशिक्षणासाठी देशभरातून केवळ 15 उमेदवारांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी 11 जण यशस्वी ठरले. विशेष म्हणजे, या यशस्वी उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातून एकमेव हर्षद शिंदे यांचा समावेश असून त्यांनी 100 पैकी 85 गुण मिळवत देशात तिसरा क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे हर्षद शिंदे यांचा अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश झाला असून, भविष्यात देशातील विविध विमानतळांवर सुरक्षा ऑडिटसाठी त्यांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्या या यशामुळे आळंदी म्हातोबाची गावासह संपूर्ण हवेली तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







