नाशिक: एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत सुरू असलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि बळजबरीने धर्मांतराच्या प्रकरणाने आता देशाला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, स्थानिक पोलिसांनी तपासाची सर्व सूत्रे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवली आहेत. एखाद्या कंपनीच्या आडून चालणारे हे रॅकेट केवळ धर्मांतरापुरते मर्यादित नसून, त्याचे धागेदोरे परदेशापर्यंत जोडलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिकमधील एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुणींना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात होते. त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, आमिषे दाखवणे आणि जर त्यांनी विरोध केला, तर त्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ करणे, असे संतापजनक प्रकार या कंपनीत सुरू होते. या रॅकेटची मुख्य सूत्रधार निदा खान अजूनही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. दरम्यान, NIA या प्रकरणातील ‘फंडिंग’चा तपास करणार आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाची उच्चस्तरीय समिती आज नाशिकमध्ये दाखल होत आहे. ही समिती पीडित महिलांशी थेट संवाद साधणार आहे. या कंपनीचे ‘शॉप ॲक्ट लायसन्स’ आधीच जप्त करण्यात आले असून,150 कर्मचाऱ्यांना सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात आले आहे.






