पिंपरी: पिंपरीतील नेहरुनगर परिसरात लग्नाच्या वादातून मारहाण आणि खुनाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीचा विवाह ठरवल्याच्या कारणावरून भावी नवरदेवाला मारहाण करण्यात आली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी दानिश आरिफ शेख (वय 18) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज उर्फ आसीफ शेख (वय 21) आणि रामा दुर्गाअण्णा चौधरी (वय 25) यांना अटक केली आहे. तसेच शहाबाज उर्फ टिपू शहा (वय 30) आणि ईशाद शहा (वय 32) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 14 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता संतोषी माता चौकात घडली. फिर्यादीच्या बहिणीचा विवाह फरहान अकबर शेख यांच्याशी ठरला होता. ते चौकात आले असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
यानंतर रात्री सुमारे 11.45 वाजता पवार पेट्रोल पंपाजवळील बालाजी ट्रेडर्ससमोर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांवर हल्ला केला. यावेळी ईशाद शहा यांनी दानिश यांना पकडून खाली पाडले, तर शहाबाज शहा याने “इसको अब खत्म कर देंगे” असे म्हणत सिमेंटचा गट्टू उचलून त्यांच्या चेहऱ्यावर वार केला. या हल्ल्यात दानिश शेख गंभीर जखमी झाले असून पुढील तपास मनोज पांडे करत आहेत.







