पुणे: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या बजेटला आता कात्री लागणार आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची संख्या प्रचंड वाढते. या वाढीव गर्दीचा लाभ उठवण्यासाठी आणि महामंडळाची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी एसटी दरवर्षी ‘हंगामी भाडेवाढ’ करते. यंदाही 15 जूनपर्यंत हा वाढीव दर लागू राहील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 15 एप्रिल ते 15 जून या ऐन गर्दीच्या हंगामात तिकीट दरात 10 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्येक तिकिटावर 2 रुपये स्वच्छता अधिभार देखील वसूल केला जाणार आहे.

विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांनी आधीच ‘ॲडव्हान्स बुकिंग’ केले आहे, त्यांनाही सुटका नाही. अशा प्रवाशांना प्रवासादरम्यान कंडक्टरकडे भाड्यातील फरकाची रक्कम भरावी लागणार आहे. ही दरवाढ प्रामुख्याने ग्रामीण भागाची वाहिनी असलेल्या ‘लाल परी’ (साधी बस) आणि निमआराम (एशियाड) गाड्यांसाठी आहे. मात्र, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू प्रवाशांना दिलासा देत महामंडळाने शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, आणि ई-बस (शिवाई) या सेवांना या दरवाढीतून वगळले आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक (75 वर्षांवरील मोफत प्रवास) आणि महिला सन्मान योजना (50% सवलत) या सवलती वाढीव दरावरही लागू राहतील, त्यामुळे पात्र प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा. एसटी महामंडळाने जरी ही वाढ सेवा सुधारण्यासाठी असल्याचे म्हटले असले, तरी प्रवाशांच्या मते हा निर्णय उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंदावर विरजण घालणारा आहे.






