पुणे: सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे, मात्र अशातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन वाढत्या तापमानापासून दिलासा मिळू शकतो. परंतु, या पावसाचा मोठा फटका हा फळ बागांना बसू शकतो.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार पाच एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच या काळात वादळाचा इशारा देखील देण्यात आला असून, वाऱ्याचा वेग 30 -40 किमी प्रतितास राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहणार आहे. तसेच पुढील पाच दिवसांत उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण असेल. यावेळी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील इतर भागात उष्णतेची लाट मात्र कायम राहणार आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भ चांगलाच तापला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. बीडसह सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तापमान चांगलेच वाढले आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 -40 किमी राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सोबतच काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे.
विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असून उपराजधानी असलेल्या नागपुरात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज देखील नागपुरातील कमाल तापमान हे 42 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तीव्र उन्हाचा आणि उकाड्याला तोंड द्यावे लागणार आहे.