लहू चव्हाण
Rain | पाचगणी : पाचगणी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात गारपीटही होत आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजेच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. मुसळधार पाऊस झाल्याने बाजारपेठेतील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते.रविवारची सुट्टी असल्याने एकीकडे अवकाळी पावसात पर्यटकांनी भिजण्याचा आनंद घेतला तर बच्चे कंपनीने गारा वेचण्याचा आनंद घेतला. दुसरीकडे गारपीटीमुळे हातातोंडाशी आलेल्या पीकांचे नुकसान झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
तीन दिवसांपासून परिसरात वातावरण ढगाळ…
मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने जमिनीवर पांढऱ्या शुभ्र गारांचा खच पडला होता. तीन दिवसांपासून परिसरात वातावरण ढगाळ असून सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट यामुळे वातावरण ढवळून निघाले होते.
दरम्यान, जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे महाबळेश्वर – पाचगणी मुख्य रस्त्यावर भोसे खिंड जवळील मालाज फॅक्टरी जवळ पर्यटकाच्या गाडीवर झाड पडल्याने गाडीचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर टेबल लॅंन्ड पठारावरील पार्किंगमध्ये असणारे मोठे झाड कोसळले. झाडा जवळपास पार्क केलेल्या एका गाडीचे किरकोळ नुकसान झाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Rain Update : पुणे शहरात गारांचा पाऊस ; हवामान विभागाने जारी केला ‘यलो अलर्ट
Pachgani | पाचगणी पोलीसांना ”बिर्ला शक्ती सिमेंट” ने भेटस्वरुपात दिले बॅरिकेड्स
Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!