पुणे: पुणे शहरात आज 19 मार्च 2026 रोजी (Pune Weather) गुढीपाडव्याचा सण साजरा होत असतानाच हवामानात मोठा बदल झाला आहे. सध्या सूर्यप्रकाश असला तरी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आज पुणे शहर आणि जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेससह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज पुण्याचे कमाल तापमान 33°C आणि किमान तापमान 18°C च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सध्या हवेत 55% आर्द्रता असून पश्चिमेकडून मंद वारे वाहत आहेत. मात्र, सायंकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढून तो 30 ते 40 किमी प्रति तास इतका होऊ शकतो. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आलेल्या या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, मिरवणुका आणि बाहेरील कार्यक्रमांवर पावसाचे सावट आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, मध्य प्रदेशाच्या मध्य भागावर असलेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि तिथून कर्नाटकपर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याच्या भोर सारख्या काही ग्रामीण भागात काल गारपिटीची नोंद झाली असून, आजही काही ठिकाणी अशीच स्थिती उद्भवू शकते. येत्या 24 ते 48 तासांत पुण्यात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या 20 मार्च रोजी देखील पावसाचा जोर कायम राहू शकतो, तर 21 मार्चपासून हवामान पुन्हा कोरडे होण्याची चिन्हे आहेत.







