मुंबई : राज्यात बहुतेक ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग आज थोडासा दिलासा मिळणार असून हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता
मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत बहुतेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. आजही मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात यलो अलर्ट
विदर्भात आगामी तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे.
मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज
दक्षिण कोकणात आज अनेक ठिकाणी तर आज आणि तर आगामी दिवसात कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.