पुणे : राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगला पाऊस पडण्याची वाट बघितली जात आहे. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात पावसाचा यलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, ठाण्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भात मात्र पावसाची प्रतिक्षाच..
मान्सून संपूर्ण महाराष्ट्र सक्रिय झाला आहे. परंतु, पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे कोरडेच राहीले आहेत. दरम्यान, हवामान विभागाकडून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना रोज ‘येलो अलर्ट’ दिला जातो, मात्र पूर्व विदर्भात पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.