पुणे : राज्यात पावसानं जोर पकडला असून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळी राजा सुखावला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यात काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात मुसळधार पाऊस..
आज संपूर्ण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावासचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात जोरदार पाऊस..
काल मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तर आज सकाळी पाच वाजल्यानंतर शेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे. यामुळे अनेकांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.
धुळे जिल्ह्यातील या भागात पावसाचा कहर..
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदी काठावरील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरीच्या गल्लीत काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे अशी माहिती समोर आली आहे. तर वरवाडे भागातील हात गाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्याची घटना देखील डली आहे.