पुणे : पुणे शहरात रविवारी (दि. २३) रोजी दिवसभर उन्हाचा चटका जाणवला. दुपारनंतर ढग दाटून आले होते. केवळ हलका शिडकावाच झाला. त्यामुळे शहरात पावसाने हुलकावणी दिल्याचे चित्र होते. परिणामी, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील कोथरूड, वारजे, एनडीए, पाषाण, कोरेगाव पार्क आणि हवेली परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तर, चिंचवड, आकुर्डी परिसरात ढगफुटीसदृश ११४ मिमी. पावसाची नोंद झाली.
जून महिन्यातील पाऊस म्हटल्यावर येणारा रिमझिम पाऊस, मध्येच भुरभुर, मात्र यंदा पाऊस आला तर धुवाधार बरसणार आणि परत एक ते दोन दिवस गायब होणार, अशी परिस्थिती पुणे शहरासह जिल्ह्यात झाली. पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्यामुळे २४ आणि २५ जून रोजी पुणे वेधशाळेने यलो अलर्ट दिला आहे. मात्र, २६ आणि २७ जूनला पावसाचा जोर वाढणार असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाट विभागतही पावसाचा जोर वाढणार असून, वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.