भारत सरकारकडून श्रीलंका आणि मॉरिशससाठी यूपीआय सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटन आणि व्यवसायासाठी श्रीलंका आणि मॉरिशसला जाणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आहे. आज सोमवार, 12 फेब्रुवारीपासून भारत सरकारकडून श्रीलंका आणि मॉरिशससाठी यूपीआय सेवा सुरू केली जाणार आहे. यासोबतच या दोन देशांमध्ये यूपीआय आणि रुपे कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध असेल.
यूपीआय ग्लोबल बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेवेचे उद्घाटन करणार आहेत. अलीकडेच, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या आयफेल टॉवरवर देखील यूपीआय सेवा सुरू करण्यात आली. फ्रान्स हळूहळू ही सेवा संपूर्ण देशात लागू करणार आहे.
भारत फिनटेक क्रांतीचा लिडर म्हणून उदयास येत असून देशातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत. आता मॉरिशसमध्येही भारतातील रुप कार्डची सेवा सुरू होणार आहे. ही यूपीआय सेवा सहयोगी देशांमध्ये नेण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत.
यूपीआय सेवेमुळे दोन्ही बाजूंच्या लोकांना सीमेपलीकडे डिजिटल व्यवहारांची सुविधा मिळू शकणार आहे. श्रीलंका आणि मॉरिशसशी भारताचे सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आहेत. याशिवाय या देशांशी भारताची डिजिटल कनेक्टिव्हिटीही वाढेल.