नवी दिल्ली: नकोसे कॉल अर्थात स्पॅम कॉल करणाऱ्या अनोंदणीकृत टेलिमार्केटिंगची सर्व दूरसंचार संसाधने खंडित करण्याचे आणि त्यांना दोन वर्षांपर्यंत काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. सोबतच ट्रायने दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या नवीन सूचनांचे तात्काळ पालन करण्यास आणि यासंदर्भात केलेल्या कारवाईचे नियमित तपशील देण्यासाठी सांगितले आहे.
या कालावधीत, कोणत्याही दूरसंचार कंपनीकडून त्यांना कोणतेही नवीन कनेक्शन दिले जाणार नाही. नियामकाने दूरसंचार कंपन्यांना तात्काळ या निर्देशाचे पालन करण्यास सांगितले आहे. या ‘निर्णायक कारवाई’ मुळे अनोंदणीकृत टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून येणारे स्पॅम कॉल कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल, असे ट्रायने म्हटले आहे.
दूरसंचार नियमकांनी सर्व दूरसंचार कंपन्यांना घाऊक कनेक्शन आणि इतर दूरसंचार चॅनेल वापरणाऱ्या अनोंदणीकृत टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून प्रचारात्मक कॉल्सवर हे जरी संदेश पूर्व रेकॉर्ड केलेले किंवा संगणकाद्वारे तयार केलेले असले तरीही बंदी घालणे बंधनकारक केले आहे. नियामकाने सांगितले की, दूरसंचार सेवा प्रदात्यांना हे निर्देश जारी केल्यापासून एका महिन्याच्या आत डीएलटी प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित करावे लागेल आणि त्यानंतर सात दिवसांच्या आत अनुपालन अहवाल सादर करावा लागेल.