नवी दिल्ली : सध्या सोशल मीडिया साईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. WhatsApp, Instagram, Facebook (Meta) यांसह Telegram चा युजरवर्गही मोठा आहे. असे असतानाच आता Telegram च्या युजर्ससाठी कंपनीने एक इशारा दिला आहे. त्यानुसार, अॅप तातडीने अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
सायबर सिक्युरिटी फर्म ESET ने टेलिग्रामच्या अँड्रॉइड ॲपमध्ये एक मोठी त्रुटी शोधून काढली आहे. ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स कधीही टेलिग्राम हॅक करू शकतात. याशिवाय, या दोषाचा फायदा घेऊन हॅकर्स तुम्हाला हानिकारक फाईल्स देखील पाठवू शकतात. या बगचे नाव EvilVideo असून त्याच्या मदतीने धोकादायक फाईल्स युजर्सना पाठवल्या जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
यामध्ये फक्त 30 सेकंदाचा व्हिडिओ आहे. या बग्स असलेल्या फाईल्स टेलिग्राम चॅनल, ग्रुप्स आणि प्रायव्हेट चॅट्समध्ये शेअर केल्या जात आहेत. जेव्हा टेलिग्रामवर व्हिडिओ येतो तेव्हा तो आपोआपच डाउनलोड होतो.
ESET ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हा बग टेलिग्रामच्या जुन्या व्हर्जनवर अॅक्टिव्ह आहे. जर तुमचे टेलिग्राम ॲप 10.14.5 किंवा त्यापूर्वीचे असेल तर तुम्ही ते तातडीने ॲप अपडेट करावे, असा सल्ला कंपनीकडून देण्यात आला आहे.