नवी दिल्ली : देशात ऑनलाईन व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अगदी क्षुल्लक काही खर्च जरी करायचा असल्यास आपण ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडतो. पण हे करत असताना त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इंटरनेटची गरज भासते. त्याशिवाय, व्यवहार होतच नाहीत. पण आता तुम्हाला इंटरनेटविनाही ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे.
ऑनलाईन पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता नाही आणि तुम्ही इंटरनेटशिवाय आर्थिक व्यवहार करू शकाल. यासाठी गुगल वॉलेटने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. गुगलने नुकतीच कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टिम लाँच केली आहे, ज्यामध्ये गुगल वॉलेट व्हर्चुअल कार्ड पेमेंटशी जोडले जाईल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, Google Wallet द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसेल.
तुमचे कार्ड वॉलेटशी जोडण्यासाठी तुम्हाला एकदा सुरुवातीला इंटरनेटची आवश्यकता असेल, पण त्यानंतर तुम्ही एका साध्या टॅपवर ऑनलाईन पेमेंट करू शकाल. कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टिममध्ये तुम्ही तुमचे Google Wallet उघडताच, तुम्हाला डीफॉल्ट व्हर्चुअल कार्ड दिसेल. तुम्ही त्यावर टॅप करताच, कार्डचे तपशील रीडरच्या मदतीने NFC सिग्नल रीडरपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जे पेमेंट करायचे आहे ते पूर्ण होईल. या तंत्रज्ञानाद्वारे तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये देखील पेमेंट करू शकता.
…तर होईल अडचण
कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टिममध्ये जर तुम्ही बराच काळ ऑफलाईन असाल तर तुम्हाला पेमेंट करण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून, जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुमचे इंटरनेट किती काळ ऍक्टिव्ह होते, याची नक्की खात्री करून घ्या. असे केल्याने तुम्हाला होणाऱ्या अडचणींपासून मार्ग काढता येऊ शकेल.